सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर अपघात टाळन्यासाठी लोखंडीजाळी बसविणार; वन विभागाकडून दीड कोटी मंजूर
- MahaLive News
- Oct 7, 2022
- 1 min read

पुणे- सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर दरड कोसळून काही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू करण्यात येणार आहे. घाट रस्त्याने किल्ले सिंहगडावर जाताना अचानक दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच कोणी दुचाकीस्वार किंवा चार चाकी घाट रस्त्याने जात असेल तर त्यांच्यावरही ही दरड कोसळू शकते. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेऊन वन विभागाने तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याला संपूर्ण घाट रस्त्याला लोखंडी संरक्षक जाळी लावावी, अशी विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी निधीही दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने यासाठी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली असून, चार ठिकाणी संरक्षक कठडे उभे केले आहेत. इतर संपूर्ण रस्त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. आता पावसाळा असल्याने ते काम करता येत नाही. म्हणून पावसाळ्यानंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे. घाट रस्त्यात कुठे धोकादायक वळण आहे, त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. रस्त्याच्या कडेला वाहने थांबवू नयेत, असे वन विभागातर्फे सर्वांना सांगण्यात येत आहे.
Comments