top of page

देश-विदेशातील प्रवाशांपर्यंत पोहोचणार लातूर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने


ree

लातूर- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्पादने तयार केली जात आहेत. यापैकी तीन बचतगटांच्या उत्पादनांची विक्री आता विमानतळावरील स्टॉलद्वारे होणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रवाशांपर्यंत लातूरची उत्पादने पोहोचणार आहेत. ‘हिरकणी लातूर’ या नावाने उत्पादनांची विक्री होईल. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बचतगटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमांतून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून राज्यातील उमेद अभियानातील निवडक बचतगटांच्या उत्कृष्ठ उत्पादनांचे स्टॉल विमानतळावर प्रायोगिक तत्वावर लावण्याबाबत राज्य स्तरावरून उमेद अभियान व भारतीय विमान वाहतूक प्राधिकरण यांचेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पारंपारिक गोधडी, मध तसेच लाकडी खेळणी तयार करणाऱ्या बचतगटांच्या उत्पादनांची नागपूर विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड करण्यात आली आहे.


लातूर जिल्ह्यातील उमेद बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांनी खुल्या बाजारपेठेत स्पर्धा करावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पॅकेजिंग, ब्रॅण्डिंगचे प्रशिक्षण, हिरकणी हाट प्रदशने आयोजित करण्यात येत आहेत. नागपूर विमानतळावरील स्टॉलद्वारे विक्रीसाठी निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा येथील रूमा महिला बचतगटाचे उत्पादन असलेली पारंपारिक गोधडी, योगा गोधडी मॅट, औसा तालुक्यातील आलमला येथील उत्कर्ष महिला बचतगटाचे उत्पादन असलेले निम हनी, जामून हनी, फॉरेस्ट हनी यासारखे विविध प्रकारचे मध आणि अहमदपूर तालुक्यातील उमरगा यल्लादेवी येथील संत ज्ञानेश्वरी महिला बचतगटाचे उत्पादन असलेली खेळण्यातील लाकडी बैलगाडी या उत्पादनांची निवड झाली आहे.


नागपूर विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड झालेल्या गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच जिल्हा विपणन व्यवस्थापक वैभव गुराले यांनी निवड झालेल्या गटांना सविस्तर मार्गदर्शन केले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page