रोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध; राज्य सरकारचा महारोजगार मेळावा...
- MahaLive News
- Dec 3, 2022
- 1 min read

मुंबई- राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आज सकाळी 10 वाजता एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत. या मेळाव्यातून 7 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.
यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे. जेणेकरून स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.

Comments