महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आशा भोसले यांची निवड करणे हा राज्य शासनाचा बहुमानच; अमित देशमुख...
- MahaLive News

- Jul 30, 2021
- 2 min read

मुंबई- 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत श्रीमती आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्य शासनाचा २०२१ सालचा 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित 'सुवर्णरंग'हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या 'लोकराज्य' यावेळी भेट म्हणून देण्यात आले. भारतरत्न लता मंगेशकर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती आहेत. आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातील दिग्गज यांची मदत घेतली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सदस्य सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, विभागाचे सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालकांसह समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, प्रकाश आमटे, बाबा कल्याणी, संदीप पाटील, दिलीप प्रभावळकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी आभार मानले आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते, असे श्रीमती आशा भोसले यांनी सांगितले. या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे. सध्या राज्यात कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. तर गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मानसोहळा आयोजित करावा अशी विनंतीही त्यांनी केली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News

























Comments