गोवंडीत तीन मजली इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू; 7 जण गंभीर जखमी असून त्यांवर उपचार सुरू...
- MahaLive News
- Jul 24, 2021
- 1 min read

मुंबई- चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून 32 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास गोवंडी येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. शिवाय या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शीव आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोवंडी, शिवाजीनगर प्लॉट क्रमांक -3 येथे ही इमारत आहे. रहिवासी झोपेत असतानाच पहाटे अचानक इमारत कोसळली. त्यामुळे झालेल्या मोठय़ा आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ढिगाऱयाखाली शेख व कुरेशी कुटुंबीय अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व पालिका कर्मचाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी 11 जणांना ढिगाऱयामधून बाहेर काढून त्यांना तत्काळ नजीकच्या राजावाडी व शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या जखमींपैकी गंभीर जखमी झालेल्या चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमी मोहम्मद फैजल कुरेशी (21), नम्रा कुरेशी (17), शाहिना कुरेशी (26) या तिघांवर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर राजावाडी रुग्णालयात परवेझ शेख (50), अमीनाबी शेख (60), अमोल धाडे (38), समोल सिंह (25) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
- मोकर शबीर शेख (80)
- नेहा परवेझ शेख (35)
- शमशाद शेख (45)
- फरीन शेख (22)
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments