शेंद्रा एमआयडीसीत लाकडी पॅलेट्स बनविणार्या कंपनीला आग; लाखो रूपयांचे नुकसान...
- MahaLive News

- Jun 18, 2021
- 1 min read

औरंगाबाद- लाकडी प्लायपासुन पॅलेट्स बनविणार्या 'यश इंटरप्रायजेस' या सेक्टर 'ए' प्लाॅट क्रमांक ६९ मधील कंपनीच्या गोडाऊनला गुरुवारी (ता.१७) रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. दरम्यान, शेंद्रा अग्निशमन व महानगरपालिकेच्या बंबांनी खासगी टँकरची मदत घेत सुमारे एका तासाने ही आग आटोक्यात आणली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांना आपले तयार अथवा कच्चे सामान किंवा विविध कामांसाठी या लाकडी पॅलेट्सची गरज भासते. त्यामुळे या पॅलेट्सला मोठी मागणी असल्याने शेंद्रा एमआयडीसीमध्ये अशी कामे करणारी बरीच युनिट्स आहेत.

'ए'सेक्टरमधील लाकडी गोडाऊनला आग लागल्याचा दहा वाजून वीस मिनिटांनी शेंद्रा अग्निशमन दलास फोन आला होता. एका पत्र्याच्या शेडमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या वाळलेल्या प्लायला ही आग लागली. लाकुड असल्याने क्षणात ही आग सर्वत्र पसरली. त्यामुळे जालना महामार्गावरून ही आग स्पष्ट जाणवत होती. यावेळी आगीचे मोठ-मोठे लोट व धुराने हा परिसर पुर्णपणे काळवंडुन गेला होता. आजुबाजुला असलेले शेड व इतर कंपन्यांना यामुळे मोठा धोका पोहोचू शकला असता. दरम्यान, शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी महानगरपालिकेच्या एका बंबाची व सोबतीला चार-पाच खाजगी टँकरची मदत घेत तासाभरात ही आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला. आग आटोक्यात आली असली तरी धुराचे लोळ जागेवर सुरूच होते तर पहाटेपर्यंत ते असेच धुमसत राहतील, असे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, तासाभरातही या युनिट्स संबंधित कोणत्याही व्यक्तीने संपर्क अथवा घटनास्थळी हजर राहण्याची तसदी घेतली नसल्याचे दिसून आले. विभागीय अग्निशमन अधिकारी भरत कापसे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत उप अग्निशमन अधिकारी ओ. एस. वाघमारे, प्रमुख अग्निशमन विमोचक संदीप पाटील, मधुकर टालोत, प्रशांत कातकडे, डी.एस. सोनवणे, श्री. राठोड, श्री. भालगावकर यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद



















Comments