स्मशानभूमीच्या दिशेनं सायरन वाजवत निघाल्या 15 ते 20 रुग्णवाहिका…
- MahaLive News
- May 20, 2021
- 1 min read

#अमरावती- शहरातील हिंदू स्मशानभूमीकडे आज 15 ते 20 रुग्णवाहिका एकाच वेळी निघाल्याने अनेकांनी मनात धडकी भरली. नेमके काय झाले? अशी विचारपूस प्रत्येक जण एकमेकांना करीत होते.

कोरोनाचा प्रादुर्भावाचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसला. त्यात शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या मृत चालकाला शहरातील रुग्णवाहिका चालकांनी आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. कोविड-19 च्या प्रादुर्भावामध्ये रुग्णवाहिका चालकांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरली. प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाणे, मृत्यूनंतर कोविडचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्याचे काम रुग्णवाहिका चालकांनी सक्षमपणे पार पाडले. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली. शहरातील एक रुग्णवाहिका चालकाचाही त्यात समावेश होता. त्या चालकाचा आज (ता. 19) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय यासह काही खासगी रुग्णालये तसेच सामाजिक संघटनेकडून चालविल्या जाणाऱ्या सुमारे 15 ते 20 रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारासमोर रांगेत उभ्या होत्या. कोविडने मृत्यू झालेल्या चालकाचा मृतदेह एका शववाहिकेमध्ये ठेवण्यात आला. शवविवाहिका अग्रभागी होती. त्या पाठोपाठ 15 ते 20 रुग्णवाहिका सायरन वाजवित इर्विनच्या शवागारापासून हिंदू स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्या. येथे मृत चालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविडच्या काळात आधीच अनेकांच्या मनात भीती आहे. त्यात अचानक वीस रुग्णवाहिकांचे सायरन वाजवित स्मशानभूमीच्या दिशेने निघाल्याने अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज अमरावती
Comments