लॉकडाऊन वाढणार का? मोफत लस दिली जाणार का?; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक...

#मुंबई- १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, या बैठकीत राज्यातील मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. राज्यात सरसकट मोफत कोरोनाची लस द्यायची का याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असून नेमकी कोणती घोषणा मुख्यमंत्री ठाकरे आज करणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई





















Comments