top of page

महावितरणची पॉवरफुल कामगिरी; राज्यात १० ऑक्सिजन प्रकल्प अन् ३५ कोविड सेंटरला सुपरफास्ट वीजजोडणी...


ree

#पुणे- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान ठिकठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी प्रचंड स्वरूपात ऑक्सिजनची मागणी असताना त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना वेग देण्यात आला आहे. महावितरणने एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील १० मोठ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. ज्या कामांना इतर वेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे.यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या २० मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ ४८ तासांमध्ये ५२३ केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. जेएसडब्लू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात १०९ एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सिजन (सातारा), सोना अलॉयज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. यासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील ३५ कोविड रुग्णालयांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. जळगाव- ११, अहमदनगर- ६, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी ४, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी २, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा - प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण ३५ कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज पुणे

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page