महानिर्मितीचं मिशन ऑक्सिजन; कोराडी वीजकेंद्रातून होणार दररोज १ हजार सिलिंडर्सचा पुरवठा...
- MahaLive News

- May 3, 2021
- 1 min read

#नागपूर- कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना महानिर्मितीने मिशन ऑक्सिजनची आखणी केली आहे. त्याअंतर्गत कोराडी वीजकेंद्रातून दररोज १ हजार जम्बो सिलिंडर्स ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोराडीसोबतच अन्य वीजकेंद्रांद्वारेही नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जाणार आहे. औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू तयार होऊ नयेत, यासाठी पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अशा प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आवश्यक अभ्यासानंतर मिशन ऑक्सिजन आरंभिल्यात आले आहे. त्या अंतर्गत खापरखेडा, कोराडी, पारस व परळी या वीजकेंद्रांमधील ओझोनायझेशन प्लांटमधून त्या परिसरातील गंभीर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी गतिमान पावले उचलली जात आहेत. खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. एक ते दीड महिन्यातच या ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण व्हावी यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात कोराडी, पारस व परळी वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग, बॉटलींग प्लांट उभारून ऑक्सिजन सिलिंडर निर्मितीचे नियोजन आहे. या टप्प्यात कोराडी वीज केंद्राद्वारे दररोज तब्बल १ हजार २ जम्बो सिलिंडर्स, पारस वीज केंद्राद्वारे प्रतिदिन १२८ सिलिंडर्स, परळी वीज केंद्राद्वारे २१६ सिलिंडर्स ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. महानिर्मितीच्या खापरखेडा वीज केंद्राने ३० एप्रिल रोजी सामाजिक जाणिवेतून २५ ऑक्सिजन सिलिंडर कोरोना रुग्णांसाठी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज नागपूर
























Comments