मुंबईत आजपासून दोन सत्रात होणार लसीकरण; 45 ते 59 वर्षांतील व्यक्तींचे होणार लसीकरण...
- MahaLive News
- Apr 1, 2021
- 2 min read

#मुंबई- मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, 45 ते 59 वयामधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. मुंबईत असे एकूण 40 लाख नागरिक आहेत. त्यांचे लसीकरण 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. 31 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लसीकरण केले जात असून दररोज 40 ते 45 हजार जणांचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आज 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन सत्रात लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेने खबरदारी आणि लसीकरण वेगाने करून कोरोनाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. 16 जानेरीला लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यातील फ्रन्टलाइन वर्कर आणि तिसर्या टप्प्यातील 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असणारे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. या तिन्ही गटांत मिळून 40 लाख नागरिकांचे लसीकरण 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे. या सद्यस्थितीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लसीकरण केले जात असून दररोज 40 ते 45 हजार जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे. सद्यस्थितीत व्यवस्था असणार्या 24 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी पालिकेने दिली असून आता पालिकेच्या 10 खासगी रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या पालिका आणि खासगी अशा 108 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मुंबईत दिवसाला एक लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे. यासाठी आगामी काळात केंद्राच्या परवानगीनंतर केंद्रांची संख्याही वाढवली जाणार आहे. सद्यस्थितीत एफ/दक्षिण परळ वॉर्डमधील कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसींचे डोस साठवण्यात येत आहेत. आगामी काळात लसीकणाचा वेग वाढवण्यात येणार असल्यामुळे कांजूरमार्ग येथील पालिकेच्या भव्य कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसी साठवण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत यासाठी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. पालिकेकडे सध्या कोरोना लसीचे दीड लाख डोस असून आणखी सवादोन लाख डोस येणार आहेत. त्यामुळे लसीच्या डोसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments