top of page

मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून राख...


ree

#नागपूर- शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण नगर चौक परिसरात असलेल्या मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आज (बुधवारी) सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला सूचना मिळताच चार फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सुमारे दोन तास पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीव हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र झाले आहे. आगीचे स्पष्ट कारण अद्यापही सांगण्यात आले नाही. मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास लागली. सुरवातीला स्थानिकांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. आग भीषण असल्यामुळे आजू बाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे ४ बंब लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन जवानांनी सुमारे दोन तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूरातील लग्नसमारंभांवर निर्बंध असल्याने मंगल कार्यालयांचे साहित्य या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. या आगीत लाखो रुपये किंमतीचे लग्न समारंभात उपयोगात येणारे डेकोरेशचे साहित्य जळून राख झाले आहे. दोन दिवसात चार आगीच्या घटना सोमवारी नागपूरात तब्बल तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये नागपूर शहरातील मुख्य एसटी स्टॅण्ड (गणेशपेठ) वरील पार्सल कार्यालयाला लागली होती. तर दुसरी आगीची घटना शहरातील सेंट्रल एव्हेन्यू (सीए) मार्गावरील दोसर भवन चौकात घडली होती. या ठिकाणी ऑटो स्पेअर पार्ट आणि कुशनच्या दुकानांची चाळ आहे. आज सकाळी ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांनंतर बघता बघता आग शेजारच्या चार दुकानांमध्ये पसरली ज्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तर तिसरी घटना नागपूर काटोल मार्गावरील बोरगाव फेटरी जवळ असलेल्या युनिक ट्रेडिंग कंपनीच्या कापूस जिनिंग मिलला दुपारच्या सुमारास आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात खुलासा झालेला नाही.

@महालाईव्ह न्यूज नागपूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page