मोठा निर्णय; वीकेंड लॉकडाऊनमध्ये शेतीशी निगडित दुकानेही बंद..
- MahaLive News
- May 22, 2021
- 1 min read

#लातूर– जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी एक जूनपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये पूर्वीचा वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवला आहे. या वीकेंड लॉकडाऊनमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार बंद राहणार असून, शेतीशी निगडित दुकानेही बंद राहणार आहेत. जीवनावश्यक सेवेतील होम डिलिव्हरी वगळता अन्य व्यवहार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. २२) व रविवारी (ता. २३) दोन दिवस कडक निर्बंध लागू राहणार आहेत.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. दुसऱ्या लाटेत एका दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली. गतवर्षी एका दिवशी सर्वाधिक ५०० रूग्ण आढळून आले. दुसऱ्या लाटेत एक हजार ९१६ रूग्ण आढळले. पहिल्या लाटेत उपचार घेत असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या चार २७३ होती. दुसऱ्या लाटेत १६ हजारपर्यंत गेली आहे. पॉझिटिव्हीटी दर मागच्या वेळी ३० होता तर दुसऱ्या लाटेत ३५ पर्यंत गेला. मागील काही दिवसांत लॉकाडाऊनचा परिणाम दिसत असून, रूग्णसंख्या कमी होत आहे. येत्या एक जूनपर्यंत रूग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता असली तर सध्या जिल्हा डेंजर झोनमधून बाहेर आलेला नाही. प्रशासकीय यंत्रणा दोन महिन्यांपासून तणावात काम करत आहे. सर्वांनी सहकार्य करा. प्रशासनातील लोक तुमच्यासाठीच काम करत आहेत, याची जाणीव ठेवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात म्यूकर मायकोसिस रुग्णांची संख्या १०४ वर पोचली असून आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर ३४ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून, ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खास या रुग्णांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आल्याचेही पृथ्वीराज यांनी सांगितले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments