मागणी पावणेदोन लाख डोसची, आले १२ हजार९००; जालना जिल्ह्यात लसीकरण पुन्हा थांबण्याची शक्यता...
- MahaLive News
- Apr 22, 2021
- 1 min read

#जालना- कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यासह पात्र लाभार्थींचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सरकारसह स्थानिक जिल्हा प्रशासन याबाबत आवाहन करत असून याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून लसींचा तुटवडा निर्माण झाला असून नियोजित सत्रेसुद्धा ऐनवेळी रद्द करावी लागत आहेत. दरम्यान, १३ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी एक लाख ७५ हजार डोसची मागणी अतिरिक्त संचालक यांच्याकडे केली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यात दररोज २५ हजार लाभार्थींचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश १५ दिवसांपूर्वी दिले होते. यानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही कामाला लागली. एक-दोन नव्हे, तर सात दिवसांचे नियोजन करून २०० हून अधिक केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवता येईल असा एक्शनप्लॅनही ठरला. लसीकरण केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले व त्यानुसार ड्यूट्यासुद्धा लावल्या. लसीकरण केंद्रावर ड्यूटी लावल्यामुळे त्यानुसार अधिकारी-कर्मचारीही प्रशिक्षण घेऊन दैनंदिन उद्दिष्टपूर्तीसाठी सज्ज झाले. कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित व प्रभावी ठरलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असतानाच लसींचा तुटवडा निर्माण झाला. जालना जिल्ह्यात लसीकरणाचे किमान ७ दिवसांचे नियोजन करण्यासाठी प्रतिदिन २५ हजार याप्रमाणे १ लाख ७५ हजार डोसेसची आवश्यकता आहे. यासाठी कोविशील्ड लसीचे डोसेस द्यावेत, अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी एका पत्राद्वारे अतिरिक्त संचालक यांच्याकडे १३ एप्रिल रोजी केली होती. या पत्रात खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेऊन दिलेल्या सूचनांचाही संदर्भ देण्यात आला होता, तरीसुद्धा डोस येण्यासाठी आठ दिवस लागले.
@महालाईव्ह न्यूज जालना
Comments