पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड; कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक...
- MahaLive News
- Apr 18, 2021
- 1 min read

#पुणे- कोरोनामुळे राज्यातील स्थिती बिकट झाली असून आरोग्य सुविधांच्या अभावी लोकांचा जीव जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात एका लॅबमार्फत कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी आजवर अनेक नागरिकांना बनावट रिपोर्ट दिल्याची कबुली दिली आहे. सागर अशोक हांडे (वय 25 रा. संगम चौक, मु.नांदेड) दयानंद भिमराव खराटे (वय 21 रा. वारजे माळवाडी) अशी आरोपींची नावं आहेत. या आरोपींना बेड्या ठोकण्यात डेक्कन पोलिसांना यश आलं आहे. जंगली महाराज रोडवर असलेल्या एका लॅबमध्ये बनावट कोरोना तपासणीचे रिपोर्ट दिले जात होते. लॅबमधील सागर अशोक हांडे आणि दयानंद भिमराव खराटे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात बनावट रिपोर्ट देणारे असे किती समाजकंटक आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असे बनावट रिपोर्ट दिले जात असतील तर संसर्गाची साखळी तुटणार कशी, असा प्रश्नही आता विचारला जात आहे. शनिवारी पुणे जिल्ह्यात नव्याने 12,386 कोरोना रुग्ण आढळले, ज्यातील जवळपास निम्मे म्हणजे 6006 एकट्या पुणे शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 7 लाखाचा टप्पा ओलांडला. दिवसभरात पुणे जिल्ह्यात 100 कोरोना रुग्ण दगावले, यातील 54 मृत्यू पुणे शहरात झाले. एकूण मृतांची संख्या 11,132 झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 2982 रुग्ण तर पुणे जिल्ह्याच्या उर्वरित भागात 3848 नवे रुग्ण आढळले .पिंपरी चिंचवडमधील 32 आणि उर्वरित जिल्ह्यात काल 14 रुग्ण दगावले आहेत.
@महालाईव्ह न्युज पुणे
Comments