नागपुरात एसीत शॉर्ट सर्किट झाल्याने वेलट्रीट रुग्णालयातील ४ रुग्णांचा होरपळून मृत्यू...
- MahaLive News
- Apr 10, 2021
- 2 min read

#नागपूर- नागपूरच्या वाडी परिसरातील नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या वेलट्रीट रूग्णालयात आग लागल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. आग लागल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हलवताना दोन रूग्णांचा मृत्यू झाला, एकाचा मृत्यू दुपारीच झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीतील मृतांची संख्या वाढली असून आणखी एका जखमी रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. रूग्णालयात आगीची घटना घडली तेव्हा एकूण 31 रूग्ण उपचार घेत होते. वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती सोनभासरे (वय 35 रा. चंद्रपूर), तुळशीराम पारधी (वय 47, रा. दर्शन सोसायटी), प्रकाश बोंडे (वय 69, रा. मनीष नगर), रंजना कडू (वय 44 रा. धापेवाडा) अशी मृतांची नावे आहेत. वेलट्रीट रूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. ही आग दिसताच एसीखाली असलेल्या रूग्णाला हटवण्यात आले आहे. त्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रूग्णांना हलवण्याची धावपळ सुरू झाली. सर्वात अगोदर आयसीयूतील रूग्णांना हलवण्यात आले. ऑक्सिजनवर असलेल्या दोन रूग्णांचा धावपळीत मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वेल ट्रीट रूग्णालयातील रूग्णांना शालीनिताई मेघे, मेयो, मेडिकल, सेन रूग्णलायत दाखल करण्यात आले आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्लीवरून येताच घटनास्थळला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून या घटनेची चौकशी केली जाणार आहे, असे आदेश राऊत यांनी दिले आहेत. यात विद्युत पुरवठा रूग्णलाय दर्जाचा होता की नाही? याची तपासणी केली जाईल. फायर ऑडिटची देखील चौकशी होणार आहे. याआगी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. या घटनेची योग्य चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. आमदार समीर मेघे यांना सुद्धा पीडित रूग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली.
@महालाईव्ह न्यूज नागपूर
Comments