top of page

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ११ एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली...


ree

#मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार थोड्याचवेळात परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.आता राज्य सरकारकडून लवकरच 11 एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा आदेश काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागणी केली होती. नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. लॉकडाऊनमुळे एमपीएससीचे राज्यभरातील सर्व क्लासेस, अभ्यासिका बंद आहेत. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस बंद असल्याने गैरसोय झाली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी यासाठी मागणी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ही बाब गांभीर्याने लक्षात घेता पोरांच्या जीवांशी खेळ न खेळता ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलावी अशी मागणी आहे. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नव्हते तरी त्यांची भूमिका सकारात्मक होती. राज ठाकरेंच्या या फोननंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. ११ एप्रिलला एमपीएससीची परीक्षा होणार होती, राज्यातील कोविडचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बैठकीत परीक्षा पुढे ढकलली आहे.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page