top of page

कोरोनाच्या संकट काळात लातूर महापालिकेकडून मालमत्ताकराची विक्रमी वसुली...


ree

#लातूर- आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला केवळ मालमत्ता कराचा आधार आहे. त्यामुळे दोन-तीन महिन्यापासून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मालमत्ता कराच्या वसुलीत रात्रंदिवस काम करीत होते. यात ४४ कोटी ३९ लाख रुपये कराची वसुली करण्यात आली आहे. कोरोनाचा संकटाचा काळ असतानादेखील गेल्या तीन वर्षांतील ही विक्रमी वसुली आहे. महापालिकेचे आर्थिक वर्ष २०२०-२१ ची एकूण कराची मागणी ही ११५ कोटी ६७ लाख रुपये होती. यात गेल्या वर्षी मार्चपासूनच कोरोना सुरु झाला. काही महिने लॉकडाउन राहिले. त्याचा मोठा फटका महापालिकेच्या कराच्या वसुलीला बसला. अधिकारी कर्मचाऱ्यांना मालमत्ता कराची वसुलीच करता आली नाही. त्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर मात्र पुन्हा कर्मचाऱ्यांनी वसुलीवर जोर दिला. यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने थकबाकीवरील सर्वच व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जास्ती जास्त नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा म्हणून थकबाकीवर बारा टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेतला. या दोन्हीचा फायदा कराची वसुली वाढण्यात झाला आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांनी वारंवार बैठक घेतल्या. सहायक आयुक्त सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी रात्रीचा दिवस केला. यातून मार्चअखेर ४४ कोटी ३९ लाखांची वसुली झाली आहे. २०१७-१८ नंतर ही सर्वाधिक वसुली आहे. यावर्षी प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना व एमआयडीसीतील उद्योजकांना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली होती. यात एमआयडीसीतील उद्योजकांकडे आठ कोटी १८ लाखाची मागणी होती. त्यापैकी चार कोटी ८४ लाख वसूल करण्यात महापालिकेला यश आले; तसेच बाजार समितीने स्वतःचा मालमत्ता कराचा भरणा केला. पण, इतर व्यापारी, आडत्यांनी मात्र फारसा प्रतिसाद दिला नाही. शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांनीही कराचा भरणा केला आहे; तसेच पहिल्यांदाच महापालिकेच्या गाळेधारकांना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली होती. यात २२ लाख ८५ हजार रुपये वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. एकूण मागणीपैकी ४०.२० टक्के मालमत्ता कराची वसुली झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक वसुली आहे.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page