top of page

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत वाढ; गॅस एजन्सीसमोर वाहनांच्या रांगा...


ree

#लातूर- जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 700 रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटरची संख्याही वाढविण्यात आली आहे. तर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे. मात्र, मागणी 1 हजार सिलिंडरची आहे आणि पुरवठा 700 सिलिंडरचा होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी योग्य ते नियोजन करावे लागणार आहे. लातूर जिल्ह्यात 5 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे 12 नंबर पाटी, समाजकल्याण विभागाची इमारत तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. अनेकांना होम आयसोलेशन सल्ला देण्यात आला असला तरी शहरातील तीन ठिकाणी उपचार सुरू आहेत. दिवसाकाठी 1 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी येथील विजय एजन्सीकडे होत आहे. मात्र, 700 सिलिंडरची निर्मिती होत असल्याने तुटवडा हा कायम आहे. मागणी वाढतच असताना जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या सूचना एजन्सीधारकांना देण्यात आल्या आहेत. केवळ 20 टक्के विक्री ही खाजगी उद्योगांसाठी तर 80 टक्के सिलिंडर हे उपचारासाठी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील दोन्ही एजन्सीला ऑक्सिजन लिक्विड हे मुंबई येथून पुरवले जात आहे. त्यानुसार 7 क्यूब 700 सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत राहिली तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे मत एजन्सीधारकांनी व्यक्त केले आहे. लातूर जिल्ह्यात 5 हजार 573 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांवर घरच्या घरी उपचार सुरू असून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यावर लक्ष ठेऊन आहेत. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने शहरातील पाच नंबर चौक, बसस्थानक या ठिकाणी तपासणीही केली जात आहे. शनिवारी 692 रुग्ण आढळून आले होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील पान टपऱ्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने आठवडी बाजार देखील बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही रुग्ण संख्या वाढत राहिली तर कडक निर्बंध लादले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page