कोरोनाचा कहर; संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणी...
- MahaLive News
- Apr 19, 2021
- 1 min read

#मुंबई- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत केंद्र सरकारने याविषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली. त्यात ते म्हणाले की, वाढत्या कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात युद्धजन्य परिस्थितीसारखे वातावरण आहे. युद्धातील बॉम्बहल्ल्यात जशी माणसं मरतात तशी माणसं मरत आहेत. कोरोनाची आकडेवारील लपवण्याचे प्रकार बंद झाले आहेत. चिता जळताना दिसत आहेत. रुग्णसंख्या अजून वाढली तर देशात अराजक निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचं दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवावं. यामध्ये आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी होऊ. या अधिवेशात खासदारांना आपापल्या राज्यामधील समस्या मांडता येतील, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही संजय राऊत यांनी आपले मत मांडले. या प्रकरणात विरोधकांची काय मजबुरी आहे कळत नाही. रेमडेसिविरची साठेबाजी नफेखोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कारवाई होत होती. मात्र विरोधकांना नफेखोरांच्या मागे का उभे राहावे लागतेय, त्यामागची मजबुरी कळत नाही आहे, असा टोला त्यांनी लगावला. या प्रकरणात लपवाछपवी सुरू होती. राजकारण सुरू होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या प्रतिक्रियांमधून तसे संकेत मिळत आहेत. आता या प्रकरणात चौकशी करण्याचे संकेत जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments