कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण होतात पसार; घरी सापडेनात आणि मोबाईलही बंद
- MahaLive News
- Mar 31, 2021
- 2 min read

#लातूर- कोरोना तपासणीनंतर रुग्ण पॉझिटिव्ह येताच पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाकडून त्या रुग्णाची कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी केली जात होती. मागील काही दिवसांत रुग्णांना मोकळे रान सापडले असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दूर ठेवणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्ण पसार होत असून, ते शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश मोबाईल बंद करून संपर्कच होऊ देत नाहीत तर संपर्क झाल्यास घरी गृहविलगीकरणात असल्याचे सांगत आहेत. मुरूड (ता. लातूर) येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) घेतलेल्या बैठकीत हे वास्तव चित्र समोर आले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी पूर्वीसारखी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एन. डोंगरे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, वैभव सापसोड, डॉ. मनोज शिंदे, डॉ. हनुमानदास चांडक, तलाठी रमेश पानगावकर व ग्रामविकास अधिकारी शौकत शेख उपस्थित होते. बैठकीत गावात मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत चर्चा झाली. यात सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या १७ पैकी केवळ चारच रुग्ण संपर्कात असून, उर्वरित १३ जणांचा संपर्क होत नाही. तर मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊपैकी केवळ तीन रुग्णांचा संपर्क होत असून, सहाजण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. हे रुग्णच कोरोनाचा प्रसार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलिसांचे सहकार्य घेऊन या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे ठरले. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक ढोणे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. येथील रुग्णांना लातूरच्या एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येते. सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ नागरिक सोडून अन्य रुग्णांना पाच दिवसांत परत पाठवले जात आहे. या स्थितीत गावातच कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर चौदा दिवस सक्तीने उपचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना भोजनासाठी घरचा डबा देऊन अन्य सुविधा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. गावातील व्यापारी व दुकानांतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत कोरोनाची तपासणी करण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. नवगिरे यांनी सांगितले.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments