केंद्राकडून महाराष्ट्राचं कौतुक, राज्यात आतापर्यंत 81 लाखापेक्षा अधिक व्यक्तींना लसीचा पहिला डोस...
- MahaLive News
- Apr 6, 2021
- 1 min read

#मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरातील रुग्णसंख्याही सातत्याने वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीमही वेगाने सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचं कौतुक खुद्द केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेचं कौतुक केलंय. “महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल केंद्र सरकारनं राज्य सरकारचं कौतुक केलं. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाच्या आकडेवारीबद्दल सांगितले की, महाराष्ट्रात 81 लाखांहून अधिक व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे”, अशी माहिती पीआयबी महाराष्ट्रकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती मात्र चिंताजनक
केंद्राने लसीकरण मोहिमेबाबत महाराष्ट्राचं कौतुक केलं असलं तरी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता चिंताही व्यक्त केलीय. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड ही राज्ये अजूनही कोरोनाची अधिक चिंताजनक स्थिती असलेली राज्ये आहेत. राष्ट्रीय पातळीवर एकीण कोविड बाधितांच्या संख्येतील सहभाग आणि बाधितांच्या मृत्यूंसाठी महाराष्ट्रातील स्थिती चांगली नसल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय.
महाराष्ट्रात दिवसाला चार लाख लोकांना लस
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला राज्यात दिवसाला तब्बल 4 लाख लोकांना लस दिली जात आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. लसीकरणाचा हा वेग आणखी वाढू शकतो. त्यादृष्टीने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अधिकाअधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करु, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी सीताराम कुंटे बोलत होते. आतापर्यंत राज्यातील 82 लाख लोकांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments