औरंगाबादकरांना मोठा दिलासा, लॉकडाऊन रद्द करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
- MahaLive News
- Mar 31, 2021
- 1 min read

#औरंगाबाद- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, बुधवारपासून सुरु होणारा औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. तशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केलीय. त्यामुळे औरंगाबादकरांची लॉकडाऊनपासून सुटका झाली आहे. औरंगाबादेत 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करुन 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे औरंगाबादेत उद्यापासून लॉकडाऊन सुरु होणार म्हणून औरंगाबादकरांनी गरजेचं सामानही खरेदी करुन ठेवलं. पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता औरंगाबादेत छोटी दुकाने, बांधकाम व्यवसाय, दुचाकी – चार चाकी वाहने सुरु राहणार आहेत. तसंच लग्न समारंभाला नियमात राहून परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध होता. जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. तसंच भाजप आणि मनसे नेत्यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावणं म्हणजे उद्योजकांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका जलील यांनी केली आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 31 मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती. या आंदोलनावेळी वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही केली जाणार होती.
@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद
Comments