top of page

ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यात ९ रुग्णालयात होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट...


ree

#नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, या साठी पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील ४ उपजिल्हा रुग्णालय व ४ ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यासाठी १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात सदर प्लांट कार्यान्वित होणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून प्रतिदिन नैसर्गिक स्वरूपात ८६० जम्बो सिलेंडरची निर्मिती करण्यात येऊन सदर रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. विशेष म्हणजे सदर प्रकल्पामुळे लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नसून नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा येणार खर्च कमी होणार असून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. या प्लांटसाठी मेंटेनन्सच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. हा ऑक्सिजन प्लांट अतिशय उपयुक्त ठरणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर आता प्रकल्पाची पुढील प्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावर राबवून एक महिन्याच्या आत सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज नाशिक

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page