top of page

आग लागल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेचा स्फोट; औरंगाबादेतील घटना...


ree

#औरंगाबाद- जिल्ह्यातील वाळूजनजिक शासकीय रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर तिचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास गंगापूरहून औरंगाबादच्या दिशेने येत असताना वाळूजजवळील गरवारे कंपनीजवळ अचानक रुग्णवाहिकेला आग लागली. चालकाला वेळीच लक्षात आल्याने त्याने रुग्णवाहिकेतून बाहेर उडी घेतली. गाडीत चालक आणि डॉक्टर होते. मात्र वेळीच दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील भेंडाळा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका(एमएच १४-सीएल-०७९३) घेऊन चालक सचिन गोरखनाथ कराळे(४२) व डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे(३१) दोघेही औरंगाबाद-नगर महामार्गाने वाळूजलगतच्या पेट्रोलपंपाकडे निघाले होते. यावेळी रुग्णवाहिका वाळूज गावाच्या बाहेर येताच चालकाला मागील बाजूने धूर निघत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभी केली. यानंतर दोघेही तत्काळ बाहेर पडले. त्याच वेळी रुग्णवाहिकेने पेट घेतला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने त्या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. रुग्ण असताना जर ही घटना घडली असती तर अनर्थ झाला असता असे आता बोलले जात आहे. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कसलिही जीवितहानी झाली नाही.

@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page