शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस...
- MahaLive News
- Jul 8, 2023
- 1 min read

मुंबई- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला असून त्यासंबंधीच अध्यक्षांनी या नोटिसा दिल्या असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नुकतेच सांगितले होते. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ही प्रत त्यांच्या कार्यालयाला मागील आठवड्यात मिळाली आहे. आता आम्ही सुनावणी सुरु करु, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार असे विचारले असता नार्वेकर यांनी ‘लवकरच’ असे उत्तर दिले होते. राहुल नार्वेकर यांच्या या वक्तव्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
Comments