काँग्रेसचा मोठा निर्णय; बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा...
- MahaLive News
- Feb 7, 2023
- 1 min read

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते थोरात यांची भेट घेऊन थोरातांची समजूत काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतंय.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. यासंदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही पाठवल्याची माहिती काल थोरात यांनी दिली होती. आज अखेर त्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी राजकीय कारकीर्दीतला मोठा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसचा अंतर्गत कलह, सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांच्या वादात बाळासाहेब थोरात यांनी मौनाची भूमिका घेतली होती.
Comments