लातूरमधील १२८ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड, जलयुक्त शिवार अभियानात बी.जे.एस करणार मदत...
- MahaLive News
- Apr 6, 2023
- 1 min read

लातूर- राज्य शासनाने पुनःश्च जलयुक्त अभियान ही योजना सुरु केली असून, त्यासाठी लातूर जिल्ह्यातील १२८ गावाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित गावात तात्काळ विशेष ग्रामसभा आणि शिवार फेरी करून २० एप्रिलपर्यंत या गावातील कामाचा आराखडा सादर करावा, असे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी सुचित्रा सुगावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जेवरे, यांत्रिकी विभागाचे योगेश बिराजदार आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ज्या १२८ गावात जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे, त्या गावात तात्काळ विशेष ग्राम सभा जिल्हा परिषदेकडून बोलविण्यात यावी तसेच गावची शिवार फेरी आयोजित करावी. जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियानात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुरुवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठकीत दिल्या.
Comments