top of page

विजयादशमी - दसऱ्यादिवशीच चोरट्यांनी लुटले सोने; रावणदहन कार्यक्रमातून दागिने, मोबाईल, दुचाकी लंपास..


ree

बीड- विजयादशमीच्या मुहूर्तावर आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची परंपरा आहे. मात्र, शहरातील ग्रामदैवत खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात रावणदहनावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका विद्यार्थ्याच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. यात्रोत्सवात झालेल्या गर्दीत चोरट्यांनी हात साफ करण्याची संधी दवडली नाही. ५ ऑक्टोबर रोजी खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात रावण दहनाची परंपरा आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी अभिषेक बालाप्रसाद वैष्णव (२१,रा.एकनाथनगर, बीड) हा मित्रासमवेत गेला होता. सायंकाळी सात वाजता चोरट्यांनी लहान मुलगा हरवल्याचा बहाणा करत त्यास घेरले व या गोंधळात एकाने त्याच्या गळ्यातील ५० हजार ८५७ रुपयांची ९ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत अभिषेक वैष्णव याने पेठ बीड ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरुन गुन्हा नोंद झाला. पो.ना.गणेश जगताप तपास करत आहेत. दरम्यान, रावण दहन कार्यक्रमावेळी दोघांचे मोबाइल व एकाची नवीकाेरी दुचाकी लंपास झाल्याच्या तक्रार पेठ बीड ठाण्यात आल्या होत्या. नवरात्रोत्सवात दोन महिलांचे मंगळसूत्र व एका पुरुषाची सोनसाखळी लंपास झालेली आहे. याचा तपास बाकी असतानाच दागिने चोरीची चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page