'वेडात मराठे वीर दौडले सात' मध्ये अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका...
- MahaLive News
- Nov 3, 2022
- 1 min read

बॉलिवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' मराठी सिनेमामध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमातून अक्षय रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. काल (2 नोव्हेंबर) या सिनेमाची घोषणा करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते क्लॅप देखील देण्यात आली. एका जंगी कार्यक्रमात कलाकार आणि सिनेमाची घोषणा झाली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला दबंगस्टार सलमान खान याने देखील उपस्थिती लावली होती. अक्षय सोबत या सिनेमात महत्त्वाचे मावळे साकारणारे कलाकार प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा आहेत. या कलाकारांच्या पात्रांची ओळख करून देताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना शस्त्र देखील बहाल करण्यात आली आहे. हीच शस्त्रं (तलवारी, कुर्हाड) हे कलाकार सिनेमामध्ये वापरणार आहेत. अक्षय कुमार याने छत्रपतींची भूमिका साकारणं ही बाब अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली तर त्याने शिवरायांची भूमिका साकारण्यासाठी राज ठाकरेंनी त्याला सूचवल्याचं देखील आवर्जून सांगितलं आहे. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळी मध्ये रीलिज होणार आहे. महेश मांजरेकरांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमा भव्य दिव्य असणार असल्याचं सांगितलं आहे. हा त्यांचा ड्र्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगताना यासाठी ते मागील 7 वर्ष मेहनत घेत असल्याचेही म्हणाले आहेत.
Comments