लातूर बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा झेंडा; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता...
- MahaLive News
- Apr 29, 2023
- 2 min read

लातूर- राज्यभरात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. काही बाजार समितींच्या निवडणुका काल पार पडल्या असून त्यांचा निकाल आज 29 एप्रिल जाहीर होत आहे. तर काही बाजार समितींच्या निवडणुका या 30 एप्रिल रोजी होणार आहेत. काल पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींवर सत्ता मिळविणं हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं बनलं आहे. त्यामुळेच आता या सगळ्यात राजकीय पक्ष देखील आपलं लक्ष घालत आहे. ज्यामुळे या निवडणुकांना देखील अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.
लातूर जिल्ह्यातील दहापैकी चार ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज पार पडल्या असून त्यांचा निकाल हाती आला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत आपला झेंडा कायम ठेवला आहे 18 पैकी 18 जागावरती काँग्रेसने विजय मिळवत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने हा विजय मिळवला आहे. उदगीर येथेही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या 18 पैकी 18 जागांवरती काँग्रेस अधिकृत पॅनल ने विजय प्राप्त केला आहे. औसा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र 18 पैकी 16 जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना यश मिळाले आहे. चाकूर कृषी बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 10 तर महाविकास आघाडीला आठ जागांवरती विजय मिळाला असून चाकूर कृषी बाजार समिती वर भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखले आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले असून, त्याची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली. रात्री ९.४५ वाजता निकाल हाती लागला असून, माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. १८ पैकी १८ जागा जिंकून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता राखण्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांना यश आले आहे.
मतदारांपुढे त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा ठेवला आहे. वचनपूर्ती मतदारांना भावली त्यामुळे एकतर्फी विजय त्यांना खेचून आणता आला. जाहीरनाम्यामध्ये नवीन बाजारपेठ विकसित करण्याचा संकल्प आहे. अत्याधुनिक बाजारपेठ करण्याचे वचन मतदारांना दिले आहे. विस्तारित एमआयडीसीमध्ये भव्य बाजार समिती साकारणार असल्याचे आ. अमित देशमुख यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे. त्यांची ही घोषणा मतदारांना भावली असून, सर्वच उमेदवार विजयी झाले आहे.
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून तुकाराम ग्यानदेव गोडसे, युवराज मोहन जाधव, आनंद धोंडीराम पवार, आनंद रामराव पाटील, लक्ष्मण रामकृष्ण पाटील, जगदीश जगजीवनराव बावणे, श्रीनिवास श्रीराम शेळके, सहकारी संस्था महिला मतदार संघातून लतिका सुभाष देशमुख, सुरेखा बळवंत पाटील विजयी झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्था इमाव मतदारसंघातून सुनील नामदेवराव पडीले, सहकारी संस्था वि.जा.भ.ज. मतदारसंघ सुभाष दशरथ घोडके, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून शिवाजी किशनराव देशमुख, अनिल सुभाष पाटील, ग्रामपंचायत अ.जा.ज. मतदारसंघात बालाजी हरिश्चंद्र वाघमारे, ग्रा.पं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून सचिन विष्णू सूर्यवंशी, व्यापारी आडते मतदारसंघातून सुधीर हरिश्चंद्र गोजमगुंडे, बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा तर हमाल व तोलारी मतदारसंघातून शिवाजी दौलतराव कांबळे हे विजयी झाले आहेत.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. यात ९१.९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून ३ केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. बाजार समितीसाठी ५ हजार ९८३ मतदार होते. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ६१७, दुपारी १२ पर्यंत २ हजार ३६८, दोन वाजेपर्यंत ४ हजार ४५४, तर चार वाजेपर्यंत ५ हजार ४५० मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वाधिक ९९.२५ टक्के मतदान झाले; तर सहकारी संस्था मतदारसंघात ९८.४५, व्यापारी, अडते मतदारसंघात ८६.३३, तर हमाल, तोलारी मतदारसंघात ८७.५१ टक्के मतदारांंनी मतदान केले.
Comments