उन्हाळ्यात सर्व सामान्यांना वीज दरवाढीचा धक्का; प्रतियुनिट इतके रुपये वाढण्याची शक्यता...
- MahaLive News
- Mar 27, 2023
- 1 min read

सर्व सामान्यांना वीज दरवाढीचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता नव्या आर्थिक वर्षात वीज नियामक मंडळ वीज दर निश्चितीबाबतचा नवा आदेश जारी करणार आहे. इंधन आणि गॅस दरवाढीनंतर आता ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात सामान्यांना वीज दरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता आहे. कारण आता नव्या आर्थिक वर्षात वीज नियामक मंडळ वीज दर निश्चितीबाबतचा नवा आदेश जारी करणार आहे. मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर वीज दरवाढीच्या निर्णयावर चर्चा झाली आहे.
त्यात महाराष्ट्रात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता आधीच महागाईनं होरपळत असलेल्या सामान्यांना वीजदरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी वीजेचे दर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय महावितरणने तब्बल २५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक मंडळाकडे ठेवला आहे. त्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. त्यानंतर आता ३१ मार्चला वीज मंडळाकडून दरवाढीचे आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवे वीज दर हे एप्रिल महिन्यापासून जारी करण्यात येणार असल्यामुळं वीज मंडळाकडून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वीजेचे दर वेगवेगळे आहेत, त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागांतील ग्राहकांनाही दरवाढीचा मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीनंही वीजेच्या दरात वाढ करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं वीज नियामक मंडळानं दरवाढीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पार पाडली असून येत्या ३१ मार्चला दरवाढीची घोषणा करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात इतर ऋतुंपेक्षा जास्त प्रमाणात वीजेचा वापर केला जातो. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
#उन्हाळा #वीज #दरवाढ #mahalivenews
Comments