कर्नाटकात सहा दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 15 जाहीर सभा आणि रोड शो...
- MahaLive News
- Apr 26, 2023
- 1 min read

कर्नाटकात सध्या राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपनं तर प्रचाराचा धुरळाच उडवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत कर्नाटकात सुमारे 15 जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. ज्यामुळे राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे. पीएम मोदी 28 एप्रिलपासून कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतील आणि 7 मेपर्यंत ते प्रचारसभा, रोड शो करणार आहेत.
कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत 12 ते 15 जाहीर सभा, रॅली आणि रोड शो करणार आहेत. पीएम मोदी 28 एप्रिल, 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे अशा 6 दिवसांसाठी प्रचार करणार आहेत. याच सहा दिवसांत पीएम मोदी 12 ते 15 रॅली, जाहीर सभा आणि रोड शो करतील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या प्रचाराची सुरुवात बेळगावी येथून करणार आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बेळगावी येथील चिकोडी, कित्तूर आणि कुडाचीला ते भेट देणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी उत्तरा कन्नड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकात एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.
Comments