आज शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार, निवडणूक आयोगाकडं लक्ष...
- MahaLive News
- Jan 23, 2023
- 2 min read

मुंबई- शिवसेना कुणाची हा वाद सध्या सुरू असतांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत आज संपणार आहे. दरम्यान, पुढे शिवसेना कुणाची या बाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज दि.23 उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. आजच्या घडीला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळं तेथील निर्णय आल्यानंतर आगामी रणनीती ठरवली जाणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये निवड झाली, ती आज संपणार आहे.
यामधील काळात एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या बंडामुळं शिवसेना नेमकी कोणाची हा मोठा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेलाय. त्यावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोगाचा निर्णय येऊ शकतो. याबद्दल खासदार अनिल देसाई म्हणाले की, ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडं केली आहे. त्यावर त्यांचा अद्याप निर्णय आलेला नाही. आज सोमवारी पक्षप्रमुखपदाची मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील रणनीती ठरविली जाईल.
आयोगाचा निर्णय काहीजरी आला तरी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच असणार आहेत, अशी प्रतिक्रीया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिलीय. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी झालेली निवड बेकायदेशीररीत्या झाल्याचा दावा केलाय. परंतु याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचीही नेतेपदी निवड झालेली आहे. हे पद पक्षाच्या घटनेत अस्तित्वातच नाही असा मुद्दा ठाकरे गटानं मांडलाय. निवडणूक आयोगानं आमदार-खासदारांचं संख्याबळ लक्षात घेताना विधान परिषद, राज्यसभा सदस्यांचाही विचार लक्षात घ्यावा असा युक्तीवाद ठाकरे गटानं केलाय. कायदेशीर बाबी व्यवस्थितपणे मांडल्यानं निर्णय आपल्याच बाजूनं लागेल अशी अपेक्षा ठाकरे गटाला आहे. त्यावर निवडणूक आयोगानं निर्णय विरोधात दिल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठेवल्याचं माहिती मिळाली आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे. यावेळी शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन 'वंचित'बरोबर युती करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. त्याबद्दल आज दिशा स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
Comments