चिंताजनक; औसा येथे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढूलागली...
- MahaLive News
- Jun 18, 2021
- 2 min read

लातूर- प्रशासनाच्या कडक उपाय योजनांमुळे लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या आत आली. परिणामी बेड शिल्लक राहू लागल्याने जिल्हा अनलॉक होण्यास हिरवा कंदील दाखविला गेला. सर्व व्यवहार पूर्णवेळ सुरु झाले. टाळेबंदी शिथिल झाल्यापासून प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. औसा शहरासह ग्रामीण भागातही विनामास्क बाजारात बिनधास्त फिरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शंभरीच्या आत आलेला रुग्णांचा आकडा दोन दिवसांपासून शंभरीपार होत आहे. सध्या खरीपाच्या पेरणीचा हंगाम सुरू असून शेतकरी मोठ्या संख्येने बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शहरात गर्दी करीत असताना विनामास्क फिरणाऱ्यावर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लातूर जिल्ह्यात विक्रमी रुग्णसंख्या आढळून आली. या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यदरही वाढला होता. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने बेड अभावी रुग्णांची फरफट होत होती. यासाठी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लादले. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक कामासाठीच परवानगी दिली. विनामास्क व कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई बरोबरच आर्थिक दंड ठोठावला. परिणामी लोकांनी कोरोना नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील रुग्ण संख्या शंभराच्या आत आणली. महसुल प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून काम केल्यानेच तालुक्यासह जिल्ह्यातील निर्बंंध शिथिल होऊन बाजारपेठ पूर्णवेळ उघडण्यात आली. मात्र काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात लोकांमध्ये बेफिकीरी वाढली असून सध्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी तसेच अन्य वस्तु खरेदीसाठी शहरात मोठी गर्दी दिसून येत असून यात विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य, महसुल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यानेच शहरात कोरोना निर्बंध धाब्यावर बसवून लोक फिरताना दिसुन येत आहेत. कमी झालेली रुग्णसंख्या जर आटोक्यात ठेवायची असेल तर जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला सुचीत करुन कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करनाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा तिसरी लाट अधिक त्रासदायक ठरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर

#mahalive Mahalive News
Comments