top of page

सतेज पाटलांनी केली ठाकरेंची कोंडी; ताकदीच्या आधारावर काँग्रेसचा मजबूत दावा...

ree

काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यात कोल्हापूरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसने लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हंटलं होतं.

दरम्यान, सध्या या जागेवर शिवसेनेचे संजय मंडलिक हे खासदार आहेत. मंडलिक सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहे. पण ठाकरे गटाने राज्यातील त्यांच्या 18 लोकसभा जागांवर दावा सांगितला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभा जागेवर मोठे विधान केले आहे. दिवसेंदिवस काँग्रेसच्या या मजबूत होत चाललेल्या दाव्यानंतर कोल्हापूर मतदारसंघात ठाकरेंची कोंडी झाली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगताना ताकदीचे गणित सांगितले होते.

ते म्हणाले होते, अशा काही जागा आहेत, ज्या आज आमच्याकडे नाही परंतु आमची तिथे मेरिटवर शक्ती म्हणजेच तिथे आमचे आमदार आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या संस्था काँग्रेसकडे आहेत, त्या जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यात कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांबाबत ही चर्चा झाली आहे. एकत्र बसल्यानंतर यासाठी आग्रह करु आणि या जागा काँग्रेसकडे घेऊन निवडून आणू, असं ते म्हणाले होते. या मतदारसंघात सध्या प्रकाश आबिटकर यांच्या रुपाने शिवसेनेचा एक आमदार आहे, पण ते सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ठाकरेंचा या मतदारसंघात एकही आमदार नाही. महापालिका, जिल्हा परिषदेमध्येही ठाकरेंची फारशी ताकद नाही. 2019 मध्ये सतेज पाटील यांच्या मदतीने ‘आमचं ठरलयं’ म्हणतं मंडलिकांचा विजय सोपा झाला होता. पण आता काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page