top of page

राज्यात पावसासाठी आणखी आठवडाभर पाहावी लागणार वाट...


ree

राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास 23 जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार आठवड्यांचे पूर्वानुमान जारी करण्यात आले. यानुसार 22 जूनपर्यंत पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा पावसाची वाट पाहावी लागणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होतो. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र गुरुवारी जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार १६ ते २२ जूनच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये दिसत आहे. मॉडेलनुसार २३ जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार मध्य भारत आणि महाराष्ट्रात २३ जूनपासून मान्सूनचे पुनरुज्जीवन होत असल्याचे पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी गुरुवारी वर्तवण्यात आलेल्या पूर्वानुमानाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले. बिपर्जय चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात आत्तापर्यंत ५१ टक्के पावसाची तूट आहे. दक्षिण भारतात ५७ टक्के, तर मध्य भारतात ७३ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. १५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापतो. त्यामुळे वायव्य भारत आणि पूर्व भारत तसेच ईशान्य भारतात पावसाच्या तुटीचे प्रमाण कमी आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात ४० टक्के, तर वायव्य भारतात १९ टक्के पावसाची तूट आहे. अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्रापासून केरळपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने ही स्थिती अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेला चालना देण्यासाठी साह्यभूत ठरणार आहे, असे हवामान विभागाचे अधिकारी अनुपम काश्यपी यांनी स्पष्ट केले.


१८ ते २२ जूनदरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होऊ शकतो; मात्र राज्याच्या उत्तर भागात तसेच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. १६ ते २२ जून या कालावधीत कोकण विभागामध्ये २.५ ते १० मिलीमीटर पाऊस प्रती दिन पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरच्या आठवड्यामध्ये मात्र प्रती दिन २० ते ४० मिलीमीटर किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडू शकतो, असे सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. या कालावधीत उत्तर कोकणात सरासरीएवढा, तर दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडू शकतो. ३० जून ते ६ जुलै या कालावधीत मात्र उत्तर कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page