top of page

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा...


ree

पुणे- शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे. त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी येथे शालेय शिक्षण विभागाच्यावतीने 'स्टार्स' व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते. मंत्री श्री. केसरकर म्हणाले, या राज्यस्तरीय कार्यशाळेत सर्वच विभागांनी, महापालिका, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाने उत्कृष्टरित्या सादरीकरण केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, वस्तुनिष्ठ इतिहास स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे, असेही श्री. केसरकर म्हणाले.


शिक्षणमंत्री पुढे म्हणाले, कोविड कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व घटकांनी सांघिकपणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३ हे वर्ष 'गुणवत्ता वृद्धी वर्ष: म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाने निपुण भारत अभियान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रशासकीय व शैक्षणिक बाबींचे नियोजन, सनियंत्रण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी परिषदेचे उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उहापोह केला. परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी पायाभूत शिक्षणाचा आराखडा या विषयावर संवाद साधला. राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयावर विभाग प्रमुख राजेंद्र वाकडे यांनी मार्गदर्शन केले. 'क्वेस्ट' या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर यांच्या प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापन या विषयावरील सादरीकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी 'राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण' अहवाल, 'परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स' नुसार महाराष्ट्राचे यश, स्टार्स, समग्र शिक्षाअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी, पीएम श्री शाळा, व्यावसायिक शिक्षण आदी विषयांवर श्री. पगारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विविध उपक्रम, वाचन लेखन या बरोबरच समजपूर्वक वाचन, आकलन, साहित्याचा रसास्वाद यास असलेले महत्त्व या विषयावर श्री. दिवेगावकर यांनी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी बृहन्मुंबई मधील विविध शैक्षणिक गुणवत्तेचे कार्यक्रम व इंद्रधनुष्य उपक्रम याविषयी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, संजय चव्हाण, वर्षा घुगे यांनी अनुक्रमे सोलापूर, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले.


शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व संध्या गायकवाड यांनी सांगली व पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले. कृषी विभागाचे संचालक रावसाहेब भागडे यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश या विषयावर सादरीकरण केले. नवसाक्षरता अभियानाचे स्वरुप व क्षेत्रीय यंत्रणेची जवाबदारी या विषयावर योजना संचालनालयाचे संचालक डॉ.पालकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. बालभारतीचे संचालक श्री. पाटील यांनी बदलती पाठ्यपुस्तके या विषयावर संवाद साधला. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षणाचा सुधारित आकृतीबंध या विषयावर मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page