top of page

राज्यात दंगली घडवल्या जात असल्याच्या शंका; जयंत पाटील...


ree

राज्यात काही दिवासांपासून होणाऱ्या हिंसाचारावरून जयंत पाटील यांनी शिंदे सरकावर टीका केली. "या दंगली घडविल्या जात आहेत, अशी शंका आहे. राज्यात एका पॅटर्ननुसार दंगली होत आहेत. ज्या मतदारसंघात विरोधकांची जास्त ताकद आहे, अशा ठिकाणी दंगली घडवल्या जात आहेत," असा दावा पाटलांनी केला. तसेच जाहिरात प्रकरणावर बोलताना एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. भाजपने याचा विचार करावा, असा टोला लगावला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी दंगली घडविण्यात येत आहेत. प्रबळ विरोधकांच्या मतदारसंघातच या दंगली घडत आहेत.


विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दंगलींचा पॅटर्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत जयंत पाटील यांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. त्यावेळी वाढत्या गुन्हेगाराचा त्यांनी आढवा घेत योग्य त्या सूचनाही त्यांनी केल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडवून दंगली घडत आहेत. या दंगली घडत नसून घडवल्या जात आहेत, अशी आम्हाला शंका आहे. कारण राज्यात घडणार्‍या दंगली एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. एकाच वेळी ठरवून लोक रस्त्यावर उतरत आहेत. ते म्हणाले, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या दंगली घडविल्या जात असल्याची शंका येते.


ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर अशा ठिकाणी या घटना घडत आहेत. या दंगलींमध्ये एकच पॅटर्न वापरला जात आहे. पाटील म्हणाले, कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे, अशा ठिकाणी दंगल होते, हे मात्र शंकास्पद आहे. या दंगलींकडे गृहविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. गृहमंत्र्यांनी आता यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. गृहमंत्री यांनी याबाबत बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. सोशल मीडियाच्या फेक अकाऊंटचा गृहविभागाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


वारकर्‍यांवर 300 वर्षात कधीही लाठीमार झाला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील ब्रिटिशांनी सुद्धा अशी वागणूक वारकर्‍यांशी कधी केली नाही. विठ्ठलावर भक्ती असणारा सरळमार्गी शांततेच्या मार्गाने जाणार्‍या संप्रदायावर कधीही असा प्रकार झाला नव्हता. एका वारकर्‍याला डांबून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निषेधार्ह असून या घटनेने देशातील वारकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वत: सर्वे केला आहे. यामध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक बहुमत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. भाजपनेच आता याबाबतचा विचार करणे गरजेचे आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीपुढे टिकाव लागणार नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

#जयंतपाटील

@महाLive News



Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page