top of page

औराद शहाजानी येथे जुगारावर धाड; ४० चारचाकींसह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; ६७ जुगाऱ्यांना पकडले...

औराद शहाजानी येथे जुगारावर धाड; ४० चारचाकींसह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; ६७ जुगाऱ्यांना पकडले

ree

लातूर- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तांबाळावाडी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री धाड टाकली. यावेळी ६७ जुगारी आढळून आले. पोलिसांनी जवळपास ४० चारचाकी, मोबाइल, जुगाराचे साहित्य, असा तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरूच होती. पाेलिसांनी सांगितले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या तांबाळावाडी (ता. निलंगा) हा भाग डोंगराळ आणि घनदाट झाडीचा आहे. तेथे जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याने चाकूर आणि निलंग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोरे, पोउपनि. चिरमाडे, औराद शहाजानी ठाण्याचे सपोनि. विठ्ठल दुरपडे, पोउपनि. गोपाळ शिंदे यांच्यासह पोलिस पथकाने शनिवारी मध्यरात्री धाड टाकली.


घटनास्थळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील ६७ जण आढळून आले. यावेळी पोलिसांनी सहा लाख १५० रुपयांची राेकड जप्त केली. शिवाय, जवळपास ३० ते ४० चारचाकी वाहने, मोबाइल, संगणक, लॅपटॉप, पैसे मोजण्याची मशीन, असा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाड पडल्यानंतर काही जुगारी अंधार आणि झाडीचा फायदा घेत पसार झाल्याचे समजते. रविवारी दिवसभर सहायक पाेलिस निरीक्षक दुरपडे यांच्यासह पोलिस कर्मचारी आरोपींचा जबाब नाेंदवीत हाेते.


हा जुगार अड्डा परवाना घेऊन चालविला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, रात्री १० वाजल्यानंतर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पाेलिसांनी धाड टाकली. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पाेलिसांनी सांगितले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page