सुषमा अंधारे यांचे पती करणार शिंदे गटात प्रवेश...
- MahaLive News
- Nov 13, 2022
- 1 min read

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अतिशय कमी वेळात त्यांचं चांगलच नाव कमवलं आहे. सुषमा अंधारे यांनी नेहमी शिंदे गटाला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिंदे गटाने मोठा डाव खेळला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी उपनेत्या असं पद दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. एवढंच नाही तर अंधारे यांच्या रडारवर शिंदे गट आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला.
Comments