मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल...
- MahaLive News
- Feb 11, 2023
- 2 min read

लातूर- राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तारावून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. सात महिन्यांपासून शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. यावरुन आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. तसेच अजित पवार यांनी शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का? असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आलं आहे, यांचा मंत्रिमंडळ विस्तार प्रस्तावित होता, मात्र ते करत नाहीत. कारण यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय होईल याची भीती आहे.
एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा कारभार आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. नुसतं सभा मारून लोकांची कामे होत नाहीत तर सर्वसामान्य लोकांना वेळ देणारा, कामं करणारा नेता लागतो असा टोलाही त्यांनी शिंदे सरकार आणि भाजपला लगावला आहे. लातूर जिल्ह्यात आज नूतन सरपंचांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अजित पवार अहमदपूरला आले होते. नूतन सरपंचांना मार्गदर्शन करताना त्यांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख कामे करण्यावर भर दिला. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य लोकांसाठी वेळ द्यावा, त्यांची कामे करावीत हे अपेक्षित असतं. मात्र, आजकाल सभा मारून नेणारे भाजपसारखे नेते तयार झाले आहेत अशी टीका त्यांनी केली.
"दिल्ली येथे बसून अनेक डे साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'काऊ हग डे' साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही शेतकरी आहोत. गाईच्या अंगावरून हात फिरवला जातो. हग केले जात नाही. ती लाथ घालत असते. याची कोणतीच माहिती नसलेले लोक असे डे साजरे करतात. जुन्या काळात वय झालेली जनावरे बाजारात नेली जात असत. आता ती विकायची नाही असं भाजप सरकार सांगतंय. मात्र, त्यांच्या चाऱ्याच्या प्रश्नाचं काय? त्याची उपाययोजना काय? याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. असं निर्णय शून्य हे सरकार आहे." अजित पवार म्हणाले.
हे घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चेत होता. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांची नाराजी ओढून घेणे त्यांना शक्य नाही. एका एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. यामुळे विकासकामांना गती नाहीये लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. याची कसली जाणीव सरकारला नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
Comments