सातारा पोलिसाच्या सतर्कतेने अचानक पेट घेतलेल्या शाळकरी बसमधील वाचले २१ मुलांचे प्राण...
- MahaLive News
- Oct 1, 2022
- 1 min read

सातारा- सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. या स्कूल बसमध्ये 21 विद्यार्थी प्रवास करीत होते. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर मुले घरी परतत असताना ही घटना घडली. ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांना सुखरूप वाचविण्यात यश आले.
सातारा-कोरेगाव मार्गावर खावली येथे एका खाजगी बस शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेने चालली होती. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने पेट घेतला. ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात ही बाब आल्याने त्यांनी बस चालकाला थांबण्याची विनंती केली.
यावेळी क्षणाचाही विलंब न करता, बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढले. या बसमधून 21 मुले घरी जात होती. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळलेले आहे. बसने अचानक पेट घेतल्याने धुराचे लोट निर्माण झाले होते. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले. या आगीत बसचे नुकसान झाले आहे.
©महालाईव्ह न्यूज सातारा
Comments